Thursday, May 3, 2012

काही माझ्याबद्दल


मी मेधा माधव कानिटकर. मी मुळची मुंबईची, म्हणजे गिरगावातली. शालेय शिक्षण पुर्ण होईपर्यंत आम्ही गिरगावातच रहात होतो. माझ्या आईला पर्यटनाची खुप आवड आहे, सहाजिकच ते बाळकडु माझ्या नसानसात भरले गेले. मी ६ – ७ वर्षांची असल्यापासुन बहुतेक दर दिवाळी, आणि मे महिन्याची सुट्टीत आम्ही वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळी जात होतो. आधी मे महीन्याच्या सुट्टीत आजोळी कोकणात जात होतो. अगदी तेव्हापासुन निसर्गाच्या कुशीत जाऊन उबदार वातावरणात फिरायची सवय लागली.

आमच्या भटकंतीची सुरुवात १९७४ साली अष्टविनायकाच्या दर्शनाने झाली. त्यावेळेला मऊ मऊ सीटस आणि मोठ्या मोठ्या खिडक्यां असलेल्या मोठ्या बसमधुन फिरताना आलेली गम्मत आजही माझ्या चांगली लक्षात आहे. त्या नंतर १९७५ मध्ये गोवा फिरुन आलो. त्यावेळी तिथे पाहिलेली श्री. रवळनाथाची यात्रा, आणि आरतीच्या वेळेला देवळात जमणारी भुते, आजही माझ्या डोळ्यासमोर येतात. अशी एक एक ठिकाणे करता – करता आमचा किमान दोन वेळातरी अगदी आसेतु हिमाचल संपुर्ण भारत फिरुन झाला. काश्मीर, वैष्णोदेवी, केदारनाथ, बद्रीनाथ, जमनोत्री, गंगोत्री, जगन्नाथपुरी, कोंणार्क, सिमला, कुलु, मनाली, खजियार, डलहौसी, रोहटांगपास, नेपाळ – पशुपतीनाथ, अमृतसर, हरिद्वार, ऋषीकेश, वाराणसी, सोमनाथ, डाकोरनाथ, मथुरा, द्वारका, दिल्ली, आग्रा, अजमेर शरिफ, पुष्कर, नाथद्वारा, मसुरी, नैनीताल, उदयपुर, जयपुर, बोधिगया, धरमशाला, चंदीगड, ………. किती किती ठिकाणांची नावे घेऊ? आईमुळेतर मी आणि माझी मुलगी सिंगापुर, पट्टाया, कौलालंपुर वगैरे ठिकाणी पण जाऊन आलो. थोडक्यात काय, तर आजही फिरण्याचे वेड संपलेले नाहीये.

प्रत्येक ठिकाणाच ऐतिहासिक महत्व वेगळं, बांधकाम वेगळं, भाषा, आचार, विचार, रहाणिमान, सगळ सगळ वेगळं, सगळ्या ठिकाणाचा वेगवेगळा ठसा, तसाच महाराष्टातील प्रेक्षणिय गोष्टींचा ठसा वेगळा. ज्या नजरेने आपण ताजमहाल पाहु, त्याच नजरेने बीबी का मकबरा पण पाहु, पण मनात घोळणारा विचार वेगळा असतो. पण जे ठिकाण मी पहाते आहे, त्याची माहीती मला असावी, या विचारानी मला मिळेल ते पुस्तक, मग ते हस्तलिखित असो, कादंबरी असो, नाही तर बखर असो, जे वाडःमय मिळेल ते मी वाचत गेले. त्यामुळे आज माझे वाचन खुप दांडगे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वाचन करता करता, मी महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अर्थात थोरले छत्रपती शिवाजीराजे, त्यांचे सुपुत्र शंभुराजे, येसुबाई, राजाराम, ताराराणी, शाहु, तसेच पेशवे कुटुंबिय वगैरेंच्या कधी प्रेमात पडले ते समजलेच नाही.

एकामागुन एक पुस्तके वाचताना, संभाजीराजांच्या व्यक्तिमत्वाने मात्र मला भुरळ घातली, त्यांच्याबद्दल जाणुन घ्यायचं जणु काही वेड लागलं मला. मग हळूहळू त्यांच्याबद्दल विविध कादंबर्यामधून अधिकाधिक माहीती मिळवू लागले. कित्येक वेळा वाचताना मनात सतत वाटत असे, की नाही जे लेखकानी वर्णन केलाय, तसे संभाजीराजे असूच शकत नाहीत.

संभाजीराजांचा अभ्यास करण्यासाठी मी ज्या ज्या ठिकाणी भेट दिली, तिथे माझ्याशी ती ती ठिकाणे संवाद साधत आहेत, असे भास व्हायला लागले. मी स्वत: संगमेश्वर, कर्णेश्वराचे देऊळ, नावाडी, डिचॊली येथिल सप्तकोटेश्वराचे देऊळ, गोवा येथिल पंचगंगानदीचा तीर, पन्हाळा, तेथिल सज्जकोठी, रायगड, प्रत्यक्ष दिल्लीपतीचा लाल महाल, आग्रा वगैरे बर्याच ठिकाणी जाऊन आले. काही तत्कालीन युरोपियन / डच / मुघली अखबार वाचले. आणि संभाजीराजांचे व्यक्तिमत्व जसे काही नाटककारांनी / लेखकांनी रंगवल्यानुसार बदफैली, दारुबाज नसून एका तेजस्वी सुर्याचा अंश आहे, आणि प्रत्येक मराठी मनाला त्यांचा अभिमान वाटावा असे त्यांचे आयुष्य असल्याची जाणीव झाली.

माझ्या मित्रांनी मला केवळ कादंबरीवर विसंबून इतिहासाचा अभ्यास करणे बरोबर नसल्याचा मोलाचा सल्ला दिला. आज त्यांच्या ह्या सल्ल्याबद्दल मी त्यांची मनापासुन ऋणी आहे.

मला जसे जसे एखादे व्यक्तिमत्व समजले, तसे तसे त्यांच्याबद्दल लिहिण्याचे धाडस मी केले.

माझ्या ह्या अभ्यासाला माझ्या आईचे आशिर्वाद आहेतच, आपला पण पाठिंबा असावा, ही विनंती.

मेधा कानिटकर
॥ श्री सखी राज्ञी जयती॥